कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊ मतदारसंघांत मोठ्या चुरशीने जोरदार मतदान होत असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मात्र मतदान कमालीचे घटले. कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार यापेक्षा मतदान का घटले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. चर्चेतून दोन-तीन कारणे ठळकपणे समोर आली आहेत.
कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६०. ८७ टक्के इतकेच मतदान झाले. त्यातही मतदान न करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.
यावेळी दोन लाख ८६ हजार १६९ मतदारांपैकी ९२ हजार ८४० पुरुष मतदारांनी, तर ८१ हजार ३६५ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी घटण्यामागे दोन-तीन कारणे ठळकपणे दिसतात. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी होती. त्यातही ही निवडणूक आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत जाधव यांच्यात झाली. जेव्हा तीन ते चार मातब्बर उमेदवार असतात तेव्हा सर्व उमेदवारांची यंत्रणा कामाला लागते. मतदारांना मतदान करण्याकरिता बाहेर काढले जाते; पण येथे मतदारारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फारसे प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाले नाहीत.दुसरे एक महत्त्वाचे कारण ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदार संघाचे आहे; कारण ‘उत्तर’मधील बहुतेक सर्वच नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांनी ‘दक्षिण’च्या निवडणुकीत वाहून घेतले होते. त्यांचे ‘उत्तर’कडे दुर्लक्ष झाले. परिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या.
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही. तिसरे कारण तोंडावर असलेल्या दिवाळी सणाचे आहे. दिवाळीच्या आठ दिवस आधी महिला फराळ बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. सध्या घरोघरी ही कामे सुरू असल्याने महिला तुलनेने कमी बाहेर पडल्या. पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम झाला. निवडणुकीतील चुरस प्रचारादरम्यान केवळ प्रमुख कार्यकर्ते, उमेदवारांतच दिसली. ती मतदारांत दिसली नाही. त्यामुळेच मतदान घटले.
- अशीही एक चर्चा!
शहरातील एका वसाहतीत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना ‘लक्ष्मी’दर्शन घडविले; पण घरोघरी ही लक्ष्मी पोहोचली नाही. घरापर्यंत लक्ष्मी येईल या अपेक्षेत असलेल्या मतदारांची निराशा झाली. त्यामुळे येथे मतदार बाहेर पडलेच नाहीत. दुपारी तीननंतर उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच अनेकांनी तिकडे धाव घेऊन मतदारांना मतदान करण्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले. तरीही तेथे पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच मतदान झाल्याचे सांगण्यात येते.