कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सोमवारी कोल्हापूर शहरातील रस्त्यावर गर्दी वाढली. कोरोनाबाबतची कोणत्याही प्रकारची दक्षता नागरिक घेत नसल्याचे स्पष्ट होत असून, अशीच गर्दी राहिली तर शासनाला लॉकडाऊन तीव्र करावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिला.
कोरोनाला हद्दपार केल्याच्या आविभार्वात सोमवारी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, अशी खंत व्यक्त करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, रस्त्यावरील गर्दी हाच खरा धोका आहे. जोपर्यंत कोरोनावर लस निघणार नाही, तोपर्यंत दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सामाजिक अंतर ठेवले पाहिजे, सतत तोंडावर मास्क ठेवला पाहिजे, हात वरचेवर धुणे हे आवश्यक आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात जे यश मिळविले आहे, ते रस्त्यावर गर्दी करून घालवू असं वाटू लागलं आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी शांततेनं, संयमानं घरी राहून कोरोनावर मात करावी. अनावश्यक गर्दी करू नये. आपली स्वत:ची काळजी करावी. त्याचबरोबर इतरांचीही काळजी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.