कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावरच आरोप का केले जात आहेत. गुन्हा न सांगणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो लपवणे हादेखील गुन्हा आहे. तुम्हाला सगळं माहीत होतं तर मग पाच वर्षे गप्प का बसला होता, अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केली.
नारायण राणे मंत्री झाले त्यावेळी भाजपला खात्री झाली की आता कोणताही पक्ष आपल्यासोबत येणार नाही. तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे आरोप करून सरकार अस्थिर करायचे, सुरूंग लावायचा यासाठी एवढा आटापिटा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच त्यांना केलेली जिल्हा बंदी यासंबंधी ते म्हणाले, भ्रष्टाचाराबाबतची तक्रार दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून त्याचा तपास केला जाईल. त्यासाठी तक्रारदार स्वत: सगळीकडे तक्रार करत फिरत नाही. तक्रारदाराला चौकशी करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार सगळ्या गोष्टी घडतील, यंत्रणा त्यांचे काम करेल, आपल्या हट्टासाठी विनाकारण एखाद्या जिल्ह्याची शांतता भंग करणे योग्य नाही. माझे किरीट सोमय्या यांना आवाहन आहे की, त्यांनी जिल्ह्याची शांतता बिघडवू नये.
---
सुरक्षा देणे शक्य नव्हते..
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडव्यात यासाठी गेली दहा दिवस पोलीस यंत्रणा काम करत होती., नियोजन करत होते. पहाटेपर्यंत सगळे पोलीस बंदोबस्तात गुंतले होते. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सोमय्या यांना झेड सुरक्षा देणे शक्य झाले नसते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर बंदी करावी लागली, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
--
...म्हणून १४४ कलम
किरीट सोमय्या येणार म्हणून जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले याबद्दल ते म्हणाले, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून हे कलम लावले जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आपण अनेकदा हे कलम लागू केले आहे. एखादी व्यक्ती किंवा कारणामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. जिल्ह्याची शांतता अबाधित राखणे ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाेलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र चर्चा करून हे कलम लागू केले.
---