कोल्हापूर: मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेताना संस्कृती जपल्याचा बडेजाव मिरवणाऱ्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत ही संस्कृती जपल्याची भावना का सूचली नाही अशी विचारणा काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी सोमवारी केली.
अंधेरी पूर्व मतदार संघातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी सोमवारी माघार घेतली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाने राजकीय संस्कृती जपल्याचे विधान केले होते. त्यावरून राज्यभर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आमदार जाधव या मुळच्या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांचे पती दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे देखील भाजपचेच कार्यकर्ते होते. परंतू ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ऐनवेळी त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजय खेचून आणला. जाधव यांचे दोन वर्षातच निधन झाल्यावर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली.
त्यावेळी या भगिनीला बिनविरोध निवडून देवून राज्याला चांगला संदेश देवू या असे आवाहन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही केले होते. परंतू भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्याचा पर्याय दिला. त्यांनी त्यास ठामपणे नकार दिल्यावर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. प्रचंड राजकीय व आर्थिक ताकद पणाला लावली. परंतू कोल्हापूरने ती धुडकावून जाधव यांना आमदार केले. त्यामुळे या सगळ्या घडामोडी सोमवारी पुन्हा ताज्या झाल्या.
आमदार जाधव म्हणाल्या, पती निधनानंतर पत्नीला बिनविरोध करण्याची पध्दत आपल्याकडे आहे. शिवाय ही निवडणूक अडीच वर्षासाठीच होणार होती. तरीही भाजपने ही निवडणूक जनतेवर लादली. परंतू कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या बळावर यश मिळवून दाखवले. आणि आता अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत भाजप संस्कृतीची भाषा करत आहे. त्यांचा यापूर्वीच्या निवडणुकीतला अनुभव तसा नाही.
शाहूवाडीत जल्लोष...दिवंगत आमदार रमेश लटके हे मुळचे शेंबवणेपैकी धुमकवाडी (ता.शाहूवाडी)चे आहेत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर त्यांच्या मुळगावी व शाहूवाडी तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. मांजरे परिसरातील अनेक कार्यकत्यांनी मुंबईत जावून त्यांचे अभिनंदन केले.