कोल्हापूर : सर्वसामान्य मराठा युवकांना उभे करून त्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांची अडवणूक का करता? सरकारने सर्व प्रकारची हमी देऊनही राष्ट्रीयकृत बॅँका कर्जाबाबत युवकांना योग्य प्रतिसाद का देत नाहीत? अशा शब्दांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बॅँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी फैलावर घेतले. तसेच महामंडळाच्या माध्यमातून कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बॅँकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, कार्यकारी संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक जे. बी. करीम, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने यांच्यासह विविध बँकांचे समन्वयक उपस्थित होते.महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना राज्य शासनाने हमी घेतली असूनही राष्ट्रीयकृत बॅँका मराठा तरुणांची अडवणूक का करीत आहेत? अशी विचारणा नरेंद्र पाटील यांनी बॅँक अधिकाऱ्यांना केली.