सांगली : ऊसदर आंदोलनात मला अटक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी तत्परता दाखविली होती, तशी आता का नाही दाखवली? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संदीप राजोबा यांना बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही? पालकमंत्री पतंगराव कदम यांना एक न्याय आणि मी खासदार असताना दुसरा न्याय का?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांची कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या चार बरगड्या मोडल्या असून, अद्याप धोका टळलेला नाही. ते मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांना मारणारे मात्र उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलिसांसमोर मारामारीचा प्रकार घडला असताना, त्यांनी पतंगराव कदम समर्थक कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांवर ३०७ कलमाखाली खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही? कोल्हापुरातील ऊस आंदोलकांच्या दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर ३०७ कलमाखाली खुनाचा गुन्हा दाखल केला होता. माझ्यासाठी एक कायदा आणि पतंगरावांसाठी दुसरा न्याय कसा? कायदा एकच असेल, तर गृहमंत्र्यांनी तत्काळ पतंगरावांचे समर्थक वाळू तस्कर, विनयभंग करणारे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आणि नातेवाइकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन करून कायदा हातात घेणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. गृहमंत्र्यांच्या राज्यात ‘कायद्या’चे, की ‘काय द्यायचे’ राज्य आहे, हे त्यांनीच स्पष्ट करावे.ते म्हणाले की, पोलिसांना मारहाण दिसली नसेल, तर त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर चित्रित केलेली चित्रफीत देऊ; पण पोलिसांनी चेहरा बघून न्याय देऊ नये. पोलीस राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करीत असल्यामुळे ते निष्पक्षपणे मारहाणीची चौकशी करीत नाहीत.विश्वजित यांनीही स्टंट करावा...संदीप राजोबा यांनी पलूसच्या आमसभेत स्टंटबाजी केल्याचे पतंगराव कदम समर्थक सांगत आहेत. स्टंट करून राजोबा मोठा होत असेल, तर विश्वजित कदम यांनीही स्टंटबाजी करून पाहावी. माझे कार्यकर्ते त्यांना तुडवण्यासाठी पाठवतो, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. (प्रतिनिधी)
जो कायदा मला, तो पतंगरावांना का नाही ?
By admin | Published: June 25, 2014 1:01 AM