कोल्हापूर : शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना वर्षानुवर्षे केवळ १० रुपये चप्पल भत्ता दिला जातो. छोटा बिस्कीटचा पुडा पैशात येतो ती रक्कम चप्पल भत्ता म्हणून देत शासनाने कोतवालांची कुचेष्टाच केली आहे. भरमसाठ काम, तुटपुंजे मानधन आणि बढतीची प्रतीक्षाच अशी त्यांची स्थिती आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असलेल्या सज्जांच्या प्रमाणात कोतवालांची नियुक्ती केली जाते. शासकीय कागदपत्रांनी ने-आण, तालुक्यात आलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देणे, शासनाकडून आलेल्या शासनाच्या विविध आदेशांची माहिती नागरिकांपर्यंत पाेहोचवणे, तलाठी, तहसीलदार यांना कामात मदत करणे ही कोतवालांना नेमून दिलेले काम आहे. पण त्या व्यतिरिक्त जिथे कमी तिथे कोतवाल अशा पद्धतीने त्यांना कामे करावी लागतात. पूर्वी शासकीय टपाल ने-आण करण्यासाठी कोतवालांना फिरावे लागते म्हणून कोतवालांना १० रुपये चप्पल भत्ता मंजूर करण्यात आला होता. याबाबत १९७० पासूनची माहिती आहे. तेव्हा महागाई कमी होती, त्यावेळच्या पैशांच्या मूल्यानुसार ही रक्कम ठरवण्यात आली. पण आता ५० वर्षांनंतरदेखील या रकमेत वाढ झालेली नाही. अगदी साधी चप्पल घ्यायची म्हटली तरी ५० ते १०० रुपये लागतात. आम्हाला माणूस म्हणून जगण्याच्या लायकी एवढा तरी भत्ता द्या नाही, तर देऊ नका असे त्यांचे म्हणणे आहे.
----
तालुका : मंजूर पदे : भरलेली पदे : रिक्त पदे
राधानगरी : ३८ : ३३ : ५
भुदरगड : ३३ : २६ : ७
आजरा : २४ : २१ : ३
चंदगड : ३७ : २५ : १२
करवीर : ६२ : ४९ : १३
शाहूवाडी : ४१ : ३५ : ६
पन्हाळा : ४० : ३३ : ७
कागल : ४२ : ३७ : ५
गडहिंग्लज : ४३ : ३३ : १०
हातकणंगले : ४४ : ३७ : ७
शिरोळ : ३९ : २९ : १०
गगनबावडा : ९ : ९ : ०
एकूण : ४५२ : ३६७ : ८५
--
२०१४ पासून पदोन्नती नाही
कोतवालांना तलाठी, लिपिक, कारकून, अव्वल कारकून अगदी नायब तहसीलदार पदापर्यंत बढती मिळते; पण जिल्ह्यात २०१४ पासून कोतवालांची पदोन्नतीच झालेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये या मागण्या सकारात्मकतेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
----
अपुऱ्या मानधनात कसे भागणार?
कोतवालांना २०१९ पर्यंत ५ हजार ५०० रुपये मानधन दिले जायचे. त्यावेळी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानंतर त्यात वाढ करून ४० वर्षांपर्यंतच्या लोकांना ७ हजार ७०० रुपये व ५० वर्षांवरील कोतवालांना १५ हजार रुपये अशी वेगवेगळी रक्कम देऊ केली. त्यानंतर महापूर, कोरोनासारखी आपत्ती आणि महागाई वाढली. पण त्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प आहे. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील याप्रमाणे समान काम समान मानधन द्या, अशी मागणी आहे.
---
तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कोतवालांवरच शासनाने गेली ५० वर्षे अन्याय केला आहे. १० रुपयांच्या चप्पल भत्त्यापोटी आमचे ३७० रुपये कर कापला जातो. भाजप सरकारने ४० वर्षांखालील व ५० वर्षांनंतरच्या कोतवालांना वेगवेगळे मानधन देऊन संघटनेत फूट पाडली. आता आम्ही महाविकास आघाडी सरकारकडे सरसकट १५ हजार रुपये मानधन व चतुर्थश्रेणी कामगार म्हणून वेतनावर घ्या, अशी मागणी केली आहे.
-दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना
----