कोल्हापूर : दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला आणि शहरवासीयांची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. पण लसीचे मर्यादित डोस आणि लाभार्थ्यांची मोठी संख्या यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या. परंतु आता मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे आणि लाभार्थ्यांची संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे ‘लस घेता का हो लस’ असं म्हणण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
कोरोना संसर्गाला रोखणारी लस भारतात डिसेंबर २०२० च्या अखेरीस आली. नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु लसीकरणाबाबत गैरसमज अधिक झाल्याने ती घेण्यास सुरुवातीस अल्प प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करणारेही लस घेण्यास इच्छुक नव्हते. शेवटी जिल्हा प्रशासनाने सक्ती केल्यानंतर ही गती काहीसी वाढली.
पहिल्या तीन महिन्यांच्या लसीकरणानंतर जिल्ह्यात एप्रिलपासून दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली. तशी लस घेण्यास नागरिकांचा कल वाढला. कोरोना संसर्ग वाढला आणि नागरिकांतून भीतीचे वातावरण तयार झाले. प्रत्येक जण लस घेण्यास उतावीळ झाला. एकीकडे लसीचे डाेस मर्यादित संख्येने उपलब्ध व्हायचे तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करायचे. अनेक हेलपाटे मारूनही लस काही मिळत नव्हती. नागरिकांतून प्रशासनावर रोषही व्यक्त व्हायला लागला. वादावादीचे प्रसंग घडत होते. शेवटी पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू झाले.
आता लसीकरणाकरीता राज्य सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत. नागरिकांना आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने नागरी आरोग्य केंद्राशिवाय आणखी काही सामाजिक संस्था, माजी नगरसेवक यांच्या सहकार्याने लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. आज, सोमवारपासून ही मोहीम पुढील सहा दिवस सुरू राहणार आहे.