कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांच्या विभागाला केवळ नियोजन न जमल्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून ही कृत्रिम वीजटंचाई निर्माण करण्यात आली असून केवळ दलालांकडून वीजखरेदीसाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले, प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे महानिर्मितीच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटले आहे. केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने महावितरणचे ९ हजार कोटी रुपये देणे आहे. ते दिल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडे बोट दाखवून ऊर्जामंत्री दिशाभूल करत आहेत. केंद्र सरकारने मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे रोज २ लाख १४ हजार टन कोळसा पुरवला आहे. तर ११ एप्रिलपर्यंत रोज १ लाख ७६ हजार टन कोळसा पुरवण्यात आला आहे. घोषित आणि अघोषित या भारनियमनामुळे समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे यातून दिलासा देण्याची गरज आहे.बारामतीतच रात्री भारनियमन का?राज्यात दिवसा भारनियमन आणि बारामतीत मात्र रात्री ११ ते पहाटे ५ असे भारनियमन हा भेदभाव का असा प्रश्न हाळवणकर यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकरी रात्रभर शेतातच रहावा अशी आघाडी सरकारची इच्छा आहे काय, असे ते म्हणाले.
बारामतीतच रात्री भारनियमन का?, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 2:13 PM