कोल्हापूर : लसीकरणात कोल्हापूरचे काम चांगले आहे; पण राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची व मृत्यूची संख्या कमी का होत नाही, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. लॉकडाऊनचा चांगला परिणाम होण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, रेकॉर्ड अपडेट ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यात गोकुळची निवडणूक झाल्यामुळेदेखील रुग्णसंख्या वाढल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सायंकाळी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, मृत्यूदर, लसीकरण व उपाययोजना यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेले दोन महिने राज्यात लॉकडाऊन सुरू आहे तरी कोल्हापुरातील रुग्णसंख्या आटोक्यात का येत नाही, मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे याचे कारण काय, अशी विचारणा केली, तसेच एवढे मृत्यू का होत आहेत याचे मॉनिटरिंग करा, रुग्णसंख्या व मृत्यूचे रेकॉर्ड अपडेट ठेवा, लॉकडाऊन करीत असाल तर त्याचा परिणाम दिसण्यासाठी नियम कडक करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात झालेल्या लसीकरणाबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
--
पंतप्रधान साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. २०) देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमधील काही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील १७ जिल्हे असून, कोल्हापूरचादेखील समावेश आहे.
--