इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात आरोग्यसेवेचा सावळा गोंधळ सुरू आहे. शासनाकडून मिळालेले सहा ड्युरा सिलिंडर गायब, धोकादायक ऑक्सिजन गळती सुरूच, स्टाफ नाही, डॉक्टर नाहीत आणि मंत्री म्हणतात प्रकाश अण्णा को गुस्सा क्यू आता है, इसलीये गुस्सा आता है. असा प्रति टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.आयजीएम हे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल असताना फक्त शासनाच्या दुर्लक्षाने आरोग्य सेवा कोलमडली आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत असतानाही जाणीवपूर्वक या शहराकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. वेळप्रसंगी लागेल ते करू; पण आयजीएम आता टकाटक करणार आहे, असा विश्वासही आवाडे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.रुग्णालयात अचानक भेट देऊन पाहणी केली असता सर्व गोंधळाचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्सिजन गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नाशिक येथे आॅक्सिजन गळतीची मोठी दुर्घटना घडली, तशी एखादी गंभीर घटना घडल्यावर हे सरकार याकडे बघणार का?
सध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन गळतीमुळे एका पाईपमध्ये बर्फसदृश घनपदार्थ जमा होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने होतो. तसेच ही गळती दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. विविध सामाजिक संस्थांनी दिलेले ६० ते ७० ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीन आयजीएममध्ये वापराविना पडून आहेत. असे अनेक साहित्य मनुष्यबळ नसल्याने पडून आहे आणि रुग्णांना उपचार नाही, अशी परिस्थिती बनली आहे.शासनाने ६ ड्युरा सिलिंडर दिलेले असताना रुग्णालयात ५ पोहोचले. एक कुठे गेला माहीत नाही. मिळालेले पाच कुठे आहेत याची माहिती घेतली असता त्यातील ३ सिलिंडर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गडहिंग्लजच्या रुग्णालयात दिल्याचे सांगण्यात आले, तर दोन शहरातील एका खासगी रुग्णालयात गरज असल्याने दिल्याचे सांगितले.
एका ड्युरा सिलिंडरमध्ये किमान ३० जम्बो आॅक्सिजन सिलिंडर ऑक्सिजन मावतो एवढी त्याची क्षमता आहे. या शहरात गरज असताना ते अन्यत्र हलवण्यात आले. याला जबाबदार कोण? या संपूर्ण परिस्थितीची चाचपणी केली असता या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रकाशअण्णा को गुस्सा आता है. पत्रकार बैठकीस सुनील पाटील, प्रकाश दत्तवाडे, सतीश कोष्टी, आदी उपस्थित होते.ऑक्सिजन पार्क तयार करणारलवकरच आयजीएम रुग्णालयात सामान्य नागरिकांना, पोष्ट कोविड रुग्णांना दिवसातून गरजेनुसार ऑक्सिजन घेण्यासाठी तेथे ६० ते ७० ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीन बसवून ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे.