कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर गाभाऱ्यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीने सुचविलेल्या उपायांमध्ये श्रीपूजकांची जबाबदारी कमी आणि देवस्थानची अधिक आहे, असे असताना समितीने कोणकोणत्या उपाययोजनांवर कार्यवाही केली आणि आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी केवळ श्रीपूजकांचीच आहे का, असा सवाल श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने केला आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीपूजकांनी मोगली व आदिलशाही आक्रमणाच्या काळात मूर्तीचे संरक्षण केले आहे. त्यामुळे श्रीपूजक मूर्ती संवर्धनाबाबत अधिक जागरूक आहेत. पितळी उंबऱ्याच्या आत आर्द्रता वाढण्याचे मोठे कारण म्हणजे वायूविजनाचा अभाव हे सिद्ध झाले आहे. समितीने त्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मूर्तीवरील अभिषेक सन १९९७ सालापासून बंद आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर वस्त्र ओले करून मूर्ती पुसण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. मूर्तीवर हार-फुलांचा वापरही खूप कमी केला आहे. भाविकांनी अर्पण केलेले हार-फुले त्यांच्यासमक्ष बाहेर टाकणे शक्य नाही कारण त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. आर्द्रता नियंत्रणाचे काम सौहार्दाने करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान समितीने उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिल्यास आर्द्रता नियंत्रण लवकर साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
आर्द्रता नियंत्रणाची जबाबदारी फक्त श्रीपूजकांचीच का?
By admin | Published: June 25, 2016 12:24 AM