कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभार एवढा स्वच्छ आहे, तर मग निवडून येण्यासाठी ठरावधारकांकडून शपथा व भंडाऱ्यावर हात मारून घेण्याची गरजच काय? अशी रोखठोक विचारणा बुधवारी रात्री येथे झालेल्या विरोधी आघाडीच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी केली. कसबा बावडा मार्गावरील महासैनिक दरबार हॉलमध्ये हा मेळावा झाला. त्याला ठरावधारक मतदार व कार्यकर्त्यांचीही तुडुंब गर्दी होती.मेळाव्यात विरोधी आघाडीचे नेते सर्वश्री. सतेज पाटील, विनय कोरे, खासदार राजू शेट्टी, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, संपतराव पवार, संजय घाटगे, अरुण इंगवले, बाबासाहेब हिंदुराव पाटील, भैयासाहेब कुपेकर, सदाशिवराव चरापले, अशोकराव पवार, जालंदर पाटील, संजीवनी गायकवाड, करणसिंह गायकवाड, भगवान काटे, वीरेंद्र मंडलिक, आदी प्रमुख उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले, ‘गेली चाळीस वर्षे तीच-तीच माणसे या संघात आहेत. ही माणसे दूध उत्पादकांच्या जिवावर मोठी झाली आहेत. राज्यात ‘गोकुळ’चा जो नावलौकिक आहे, तो तुमच्यामुळेच आहे. सत्तारूढ नेते ‘गोकुळ’च्या स्वच्छ कारभाराचे एवढे डांगोरे पिटत आहेत, तर मग त्यांनी सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर आजपर्यंत का दिले नाही..? सतेज पाटील यांनी नेटाने आघाडी तयार करून चांगली मोट बांधली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन अटळ आहे.’विनय कोरे म्हणाले, ‘सभासदांच्या स्वाभिमानासाठी सतेज पाटील यांनी ही लढाई सुरू केली आहे. ही लढाई पाहूनच मी त्यांच्यासोबत आहे.’सतेज पाटील म्हणाले, ‘राजाराम साखर कारखाना व ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या निवडणुकीत बाद मतांची संख्या वाढल्याने सत्तारूढ गटाचा विजय झाला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ठरावधारक मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे. कुठल्याही दबावाला बळी पडू नका. आम्ही जे सगळे नेते इथे एकत्र आलो ते यापुढेही तुमच्यासोबत आहोत. सत्तारूढ आघाडीचे नेते आपल्याला दहा हत्तींचे बळ आल्याची वल्गना करीत आहेत; परंतु हे बळ त्यांचे स्वत:चे नसून दूध उत्पादकांच्या जिवावरच आले आहे. ही लढाई तुमच्यासाठीच आम्ही सुरू केली आहे. तेव्हा तुम्हीच उद्या परिवर्तनाचे साक्षीदार बना.’आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले अशी सत्तारूढांची स्थिती आहे. हेच लोक आता आम्हांला शहाणपणा शिकवत आहेत. त्यांना चाप लावण्याची वेळ आली आहे.’संपतराव पवार म्हणाले, ‘आम्ही आतापर्यंत दूध उत्पादकांसाठी छोटीमोठी आंदोलने करून विरोध करीत होतो; परंतु आज खऱ्या अर्थाने भक्कम पॅनेल झाल्यामुळे त्या आंदोलनाची चळवळ झाली आहे. ही चळवळच ‘गोकुळ’मधून सत्तारूढांना हाकलून लावेल.’मेळाव्यास विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारभार स्वच्छ तर भंडारा कशाला..?
By admin | Published: April 23, 2015 1:09 AM