कोल्हापूर : ‘स्थायी समिती सभेच्या कामकाजात महत्त्वाचे विषय ऐनवेळीच का घेता’ असा सवाल शुक्रवारी चिमुकल्या योगिता राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने सभापती नात्याने स्थायी समिती सभेत विचारताच अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक असे सगळेच क्षणभर गोंधळून गेले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती म्हणून जरगनगर येथील जरग विद्यामंदिरची विद्यार्थिनी योगिता राजेंद्र शिंदे या सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मान देण्यात आला.
विद्यमान सभापती संदीप कवाळे यांनी त्यांच्या कार्यालयात योगिता हिला सभापतींच्या खुर्चीत बसविले. एवढेच नाही तर आठवड्याच्या स्थायी सभेत अध्यक्ष म्हणून तिला सभागृहातील अध्यक्षांच्या खुर्चीत बसविले. संपूर्ण कामकाज तिच्या अध्यक्षतेखाली पूर्ण केले.प्रारंभी संदीप कवाळे यांनी योगिता हिला कामकाजाची माहिती दिली, आणि सभागृहात गेल्यावर काय सांगायचे याबाबत सूचना केल्या. एक वाजून दहा मिनिटांनी योगिता जेव्हा सभापती या नात्याने सभागृहात पोहोचली तेव्हा पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांनी उभे राहून तिचे स्वागत केले. स्वागताचा छोटासा कार्यक्रम होताच योगिता हिने सभेच्या कामकाजास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.नगरसचिव सुनील बिद्रे यांनी विषयपत्रिकेवरील विषय वाचून दाखविले. त्यानंतर योगिताने पहिलाच प्रश्न महिला दिनाच्या अनुषंगाने विचारला. रविवारी महिला दिन असून, महापालिकेने कार्यक्रमाचे कसे नियोजन केले आहे, याची माहिती द्या, अशी सूचना तिने केली. त्यावर उपायुक्त निखील मोरे यांनी खुलासा केला.नगरसचिवांनी ऐनवेळचे विषय वाचल्यानंतर योगिता हिने ऐनवेळचे विषय म्हणजे काय आणि ते ऐनवेळीच का घेतले जातात, अशी विचारणा केली. या अनपेक्षित सवालामुळे अधिकारी, नगरसेवक काहीसे गडबडले. ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही उत्तर देता आले नाही. शेवटी लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी काही विषयावर तातडीने निर्णय घ्यावे लागतात. म्हणून ते ऐनवेळचे विषय म्हणून सभेत चर्चेला घेतले जातात, असे सांगितले.हीरक महोत्सव स्वच्छता अभियानात सर्व नगरसेवकांनी तसेच शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगिता हिने केले. तिच्या हस्ते कंटेनरमुक्त प्रभाग संकल्पना राबविणाऱ्या आरोग्य निरीक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सभापती या नात्याने योगिता हिचा कार्यालय व सभागृहातील प्रवेश चर्चेचा आणि औत्सुक्याचा राहिला. यावेळी तिच्या सोबत प्रशासन अधिकारी व शिक्षक आले होते.