कोल्हापूर : बेघर, विस्थापित, परजिल्ह्यांतील कामगारांसाठी दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीमध्ये काही नगरसेवक, कारभाºयांनी श्रेयवादाचे राजकारण सुरू केले आहे. अधिकारी, कर्मचारी मदत वाटप करीत असताना त्यांची लुडबूड सुरू असल्याची चर्चा आहे. महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याकडून असा प्रकार होत असल्याचा आरोपही होत आहे; तर काही नगरसेवक पदरमोड करून प्रभागातील गोरगरीब लोकांना थेट मदत करीत असल्याचेही चित्र आहे.
‘लॉकडाऊन’मुळे अडचणीत असलेले कामगार, परराज्यांतील विस्थापित कामगार, बेघर व अपंग व्यक्तींना महानगरपालिकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चारीही विभागीय कार्यालयांकडून जमा झालेले साहित्य गरजू कुटुंबीयांपर्यंत पोहोच केले जात आहे. या कामात काही नगरसेवक लुडबूड करीत आहेत. दुस-याने दिलेले साहित्य आपणच मिळवून दिले असल्याचे चित्र ते निर्माण करीत आहेत.थेट महापालिकेकडूनच मदत वाटप करावी : किरण नकातेदानशूर व्यक्तींकडून जमा झालेली मदत संचारबंदीमध्ये अडकून पडलेल्या, हातावर पोट असणा-या गरिबांना पदाधिका-यांमार्फत दिली जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे होता कामा नये. उपशहर अभियंता यांनी ही मदत थेट गरजूंना पोहोच करावी, असे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक किरण नकाते यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले.