आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : महानगरपालिका प्रशासन हे कर्मचारी संघाच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट झाले असून युनियन मोठी की शासन असा येथे प्रश्न पडतो. यापुढे प्रशासनाने कर्मचारी संघाचा प्रभाव झुगारून काम करावे अन्यथा आयोगाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असा गर्भित इशारा सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शासन अध्यादेश आणि कायदे यानुसारच कामे झाले पाहिजे. कर्मचारी संघाचा दबाव घेऊन प्रशासनाने काम करायची गरज नाही. सफाई कर्मचारी खासगी सावकारीच्या फासात अडकलेले आहेत. त्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. ही फार भयानक बाब आहे. कर्मचारी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचा या सावकरांशी संबंध आहे का याची चौकशी केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांसंबंधी राज्य शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तीन महिन्यांत करावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. जर तसे केले नाही तर त्याची आयोगाला गंभीर दखल घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. सफाई कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी केली का नाही याचे सामाजिक लेखापरीक्षण केले पाहिजे.
शासनाकडून निधी येतो, योजना ठरवून दिल्या जातात पण प्रत्यक्षात त्या पोहोचत नाहीत म्हणूनच लेखापरीक्षणाचा शिफारस आम्ही शासनाकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील बहुतेक सर्वच महानगरपालिकेत शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही याबाबत शासनाला लवकरच आयोगातर्फे अहवाल दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शाहूंच्या नगरीतच वंचित
राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात वंचितांना, दलितांना आरक्षणे दिली; पण दुर्दैवाने त्यांच्याच नगरीतील महानगरपालिकेत मेहतर वाल्मिकी या मागास समाजाला अनेक गोष्टीत वंचित ठेवले गेले आहे याचे वाईट वाटते. आयुक्तांना काही गोष्टी खालचे अधिकारी कळूही देत नाहीत. अधिकाऱ्यांची साखळी आहे. अशा शब्दांत पवार यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.