लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना अचानक हटवल्यानंतर रविवारी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना मंदिराच्या दक्षिण दरवाजातच कोल्हापूरकरांनी घेराव घालत नाईकवाडे यांना का हटवले असा जाब विचारला. देवस्थान समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी राहुल रेखावर हेही त्यांच्यासोबत यावेळी होते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना हटवल्यानंतर सोशल मीडियावर वुई सपोर्ट शिवराज नाईकवाडे या हॅश टॅगने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकरांनी रविवारी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांना घेराव घालून जाब विचारला. कोल्हापूरची शाहू प्रेमी जनता, श्री अंबाबाई भक्त मंडळ, सेवाव्रत प्रतिष्ठान या संघटनांमार्फत यासंदर्भात केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांवर रोष असलेल्या संतप्त नागरिकांनी त्यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. नाईकवाडे यांना सचिव पदावरून का हटवलं? कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्याचे कारण काय? जिल्हाधिकाऱ्यांची मनमानी सहन करणार नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी पोलीसांनी कडे करुन केसरकर यांना मंदिरात नेले.
कोल्हापूरची शाहू प्रेमी जनतेमार्फत उमेश पोवार, बबन रानगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, निलेश सुतार, अनिल शिंदे, नगरसेवक किरण नकाते, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे, अनिल चाेरगे, बाबा पार्टे यांनी केसरकर यांना निवेदन दिले.
माध्यम प्रतिनिधींनाही अडवले
केसरकर यांच्यासोबत जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनाही अंबाबाई मंदिरात जाउ दिले नाही. पोलीसांसोबत वादावादी झाल्यानंतर स्वत: केसरकर यांनी मागे येउन मेटल डिटेक्टरच्या जागेत थांबण्याची विनंती केली आणि दर्शन झाल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले.