घन:शाम कुंभारयड्राव : विधवा प्रथाबंदीचा 'हेरवाड पॅटर्न’ सर्वत्र रुजत आहे. ग्रामीण भागातील महिलांची मानसिकताही सकारात्मक होत असल्याने विधवांचा सन्मान होत आहे. त्याच भावनेने यड्राव (ता. शिरोळ) येथील चलनादेवी नावलगी या महिलेने विधवा सून दीपा हिचे कन्यादान करून पुनर्विवाह केला यावेळी उपस्थितांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले.
यड्राव येथील चलनादेवी व लक्ष्मण नावलगी यांचा मुलगा सुनीलचे जून २०१३ मध्ये दीपाबरोबर लग्न झाले होते. सुनीलचे चार वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. मुलाचे दुःख व सुनेचा संसार न झाल्याची भावना त्यांना सतत टोचत होती. यामुळे त्यांनी सुनेचे मतपरिवर्तन करत तिला पुनर्विवाह करण्यासाठी आग्रह धरला आणि यश आले.दीपा ही वाणिज्य पदवीधर असून अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळ येथील प्रमोद टिपुगडे याच्याशी सून दीपा हिचा पुनर्विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यड्राव येथे रेणुकानगरमध्ये दीपा व प्रमोद यांचा ६ जून रोजी विवाह झाला. सासू, सासरे यांनी दीपाला मुलगी समजूनच तिचे कन्यादान केले. विवाह होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महादेव कुंभार व सचिन उबाळे यांनी पुढाकार घेतला.
नावलगी परिवाराचा आदर्शविधवा प्रथाबंदीचा 'हेरवाड पॅटर्न' संपूर्ण राज्यभर राबवताना विधवा सन्मानाची भावना तयार होत आहे. महिलांनीच महिलांचे सुख-दुःख जाणले तरच इतर महिलांचा सन्मान होतो. हेच ग्रामीण भागामध्ये रुजत आहे आणि स्वतःच्या विधवा सुनेचा पुनर्विवाह करून देऊन नावलगी परिवाराने इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
मुलाच्या अकाली निधनामुळे सुनेच्या संसाराचे स्वप्न अधुरे बनले. म्हणून सुनेलाच माझी स्वत:ची मुलगी मानून तिचा पुन्हा विवाह करुन दिला. तिचे आताचे सासरच तिचे कायमचेच माहेर बनले. - चलनादेवी नावलगी, यड्राव