सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फे ठाणे : समाजातील सर्वसमावेशक मंगलमय कार्यक्रमात विधवा महिलेला मानाचे स्थान नसते. कारण नशीबाने कपाळवरील सुवासिनीचा हक्क हिरवल्यामुळे मानसन्मानच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अशुभ मानली जाते. समाजाने घालून दिलेल्या अनिष्ठ प्रथेच्या भिंती मोडून टाकत पोर्ले तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील तालुका मनसे अध्यक्ष विशाल मोरे आणि पत्नी हर्षदा यांनी वटपौर्णिमेदिवशी विधवा महिलांच्या हस्ते मसाई मंदिर परिसरात वडाची झाडे लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
जुनाट रूढी परंपरांना छेद करत विधवा महिलांचा समाजात सन्मान वाढविण्याचा प्रयत्न विशाल आणि हर्षदा या नवदापत्यांनी केला आहे. समाजात अंधश्रद्धासारख्या कल्पनेला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमामुळे स्वत:च्या घरात मंगलमय प्रसंगापासून चार हात लांब असणाऱ्या विधवांना दिलेल्या मानसन्मानाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास वाढवणारा होता. काही महिलांना तर यावेळी अश्रू अनावर झाले.
महिन्यापूर्वी सामाजिक रूढी परंपरांविरोधात आवाज उठविणाऱ्या विशाल आणि हर्षदाने आंतरजातीय विवाह करून सामाजिक सलोखा निर्माण केला असल्याची भावना हर्षदाने व्यक्त केली. हर्षदाने विधवा महिलांच्या हस्ते हळद-कुंकू आणि ओटी भरणी करून घेतली. कोतोली आणि पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील बहुजन समाजातील २५ महिला उपस्थित होत्या. त्यांच्या पतीचे प्रतीक म्हणून प्रत्येक विधवा महिलेने मसाई मंदिर परिसरात वडाचे झाड लावले आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी करणार असल्याचा निर्धार केला. याप्रसंगी तालुका महिला मनसे अध्यक्ष शुभांगी पाटील, अमर बचाटे उपस्थित होते.