कोल्हापूर : पत्नीस मुलगा होत नाही म्हणून रॉकेल ओतून ठार मारल्याप्रकरणी पती, सासू, सासरे अशा तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) एस. आर. पाटील यांनी आजन्म जन्मठेप सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.अल्ताफ बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख (पती), बुढेलाल ऊर्फ दादेसाब जिनासाब चमनशेख (सासरा), सरदारबी बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख, सासू (मूळ रा. कुडची, ता. रायबाग, बेळगाव, सध्या रा. उचगाव) अशा तिघांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे.आरोपी अल्ताफ हा आपली पत्नी शाहिस्ता चमनशेख हिच्यासह बाबानगर, दबडे कॉलनी, उंचगाव येथे राहता होता. या दाम्पत्याला तीन मुली होत्या व त्या कारणाने अल्ताफ शेख हा सतत शाहिस्ता हिला मुलगा होत नाही म्हणून त्रास देत होता. त्याचे आई-वडील व नणंद असे चौघे तिला त्रास देत होते. याच कारणावरून ३० डिसेंबर २०१३ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्ताफचे आई-वडील कुडचीहून अल्ताफकडे उचगाव येथे आले. त्यांनी अल्ताफला शाहिस्ता हिला मुलगा होत नाही, तिला मारून टाक, असे भडकावले व त्याप्रमाणे अल्ताफने शाहिस्ता हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले.हा प्रकार त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीने प्रत्यक्ष पाहिला. अल्ताफ यानेच शाहिस्ताला इतरांसमवेत सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने पोलिसांपुढे नवऱ्याविरोधात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे निवासी नायब तहसीलदारांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. या कामात फिर्यादीतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. या कामात १४ साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी तीन वर्षीय मुलीची व नायब तहसीलदार, डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
क्रुरतेचा कळस; मुलगा होत नसल्याने पत्नीस पेटविले, पतीसह सासूस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:26 AM