कोल्हापूर : पत्नीला कार शिकवत असताना ती थेट आठ फूट खोल खड्ड्यात जाऊन उलटली. शुक्रवारी सकाळी राजारामपुरी महापालिकेच्या शाळा नंबर नऊच्या मैदानासमोर हा प्रकार घडला. शहरात पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हा खड्डा खोदला आहे. शिकाऊ चालक असणारी महिला किरकोळ जखमी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अधिक माहिती अशी, पत्नीला कार शिकण्याची हौस...तिने हट्ट धरल्याने पती शुक्रवारी सकाळी कार घेऊन बाहेर पडला. राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या मैदानासमोरून पाईपलाईन टाकण्यासाठी आठ फूट खोल आणि सहा फूट रुंद खुदाई केली आहे. हे काम सुरू असताना, मैदानावर पत्नीला कार शिकवत असताना ती कार थेट खड्ड्यात उलटली. दोघेही कारमध्ये अडकून राहिले. पतीने स्वत:सह पत्नीला सुखरूप बाहेर काढून सुटकेचा नि:श्वास घेतला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. या अपघातात महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या मैदानासमोरील पाईपलाईनसाठी केलेल्या खुदाईच्या खड्ड्यामध्ये उलटलेली कार.