कडगाव : सतत बदलणाऱ्या व शेतकऱ्याला सुद्धा न समजणाऱ्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम भुदरगडच्या पश्चिम भागातील काजू पिकावर झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत निम्मे उत्पादन तरी हाताला लागेल का? असा प्रश्न काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काजू उत्पादन घटल्यामुळे काजूबियांच्या पहिल्या आवकेलाच शेतकऱ्यांना तेजीतील दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान आहे. येत्या काही दिवसांत काजू बियांचा दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने व पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीमुळे असेल तसा आणि मिळेल तेवढ्या काजूबिया मिळविण्यासाठी व्यापारी स्पर्धा करीत आहेत.
तळ कोकणाला लागून असणाऱ्या भुदरगडच्या पश्चिम भागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यंदा वातावरणातील बदलामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात काजू झाडांना असलेल्या बहरामुळे यंदा काजूचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता काजू उत्पादकांनी व्यक्त केली होती. मात्र, वातावरणात होत असणाऱ्या बदलामुळे व अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे काजूच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे सध्या काजू बीचा किलोचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. तो दीडशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पारंपरिक शेती व्यवसायातून कसेबसे भागवणाऱ्या शेतकऱ्याला ऊस व भात या पारंपरिक पिकांबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली आहे. यंदा जर काजू बियांना चांगला दर मिळाला तर काजू उत्पादकांची आर्थिक घडी सावरण्यात थोडी मदत होऊ शकते.
या वर्षी काजू उत्पादनामध्ये झालेली घट यामुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला असून ज्या पद्धतीने कापूस, ऊस, कांदा यासारख्या पिकांना शासनाकडून अनुदान दिले जाते या पद्धतीने काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी.
शशिकांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते, तिरवडे, ता. भुदरगड
भुदरगड-आजरा परिसरातील काजूबियांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. या तुलनेत परदेशातून आयात केलेल्या बिया चवीच्या दृष्टीने अत्यंत सुमार दर्जाच्या असतात. कमी दरामुळे परदेशी काजूची आवक वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह छोट्या स्थानिक उद्योजकाचे गणित बिघडत आहे.
सुरेश शेवाळे नागनवाडी, काजू व्यापारी
फोटो:काजू