संदीप आडनाईककोल्हापूर : वनविभागामार्फत दरवर्षी बुध्द पौर्णिमेला वन्यप्राणी गणना करण्यात येते. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची प्रमुख जबाबदारी आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वन अधिकारी वन्यप्राण्यांची गणना करतात. या उपक्रमासाठी अनेकवेळा वन्यजीव अभ्यासकांना तसेच स्वयंसेवी संस्थेलाही या उपक्रमात वनविभाग सहभागी करून घेत असते; पण आज, बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या यावर्षीच्या वन्यप्राणी गणनेसाठी मात्र प्रथमच वनविभागाने सर्वसामान्य हौशी व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे, आणि याबाबतचे आवाहनही चक्क सोशल मीडियावरून केले आहे.
वनविभाग दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन 'पब्लिक इव्हेन्ट' करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची अंतर्गत बाब आहे. यासाठी अतिशय मर्यादित संख्या आणि वन्यजीव अभ्यासकांची आवश्यकता असते. असे असताना वनखाते वन्यप्राणी गणनेसाठी चक्क 'पब्लिक इव्हेन्ट' साजरा करत आहे. यासाठी सोशल मीडियावरून जाहिरातही प्रसारित करत आहे. लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.
बुध्द पौर्णिमेला दरवर्षी वनविभागामार्फत वन्यप्राण्यांची गणना केल जाते. यावेळीही राधानगरी वन्यविभागांतर्गत राधानगरी आणि दाजीपूर, शाहूवाडी, पन्हाळा, चांदोली, कोयनानगर, सागरेश्वर आदी ठिकाणी ही वन्यप्राणी गणना होणार आहे. यात प्रत्येक पाणवठा आणि त्यावरील मचाणावर एका हौशी व्यक्तीसोबत एका वनरक्षकाची नियुक्ती केली आहे. पेन आणि नोंदवहीसह या व्यक्ती रात्रभर मचाणावर राहून वन्यप्राण्यांची नोंद करणार आहे. यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करून प्रथम येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी केली आहे. - विशाल माळी, वन अधिकारी, राधानगरी वन्यजीव विभाग
वन्यप्राणी गणनेसाठी सोशल मीडियावरून आवाहन करून अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेणे नियमबाह्य आहे. यामुळे वन्यप्राणी गणनेच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते, यासाठी या उपक्रमात सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेऊ नये. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ.