कोल्हापूर : वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसंदर्भात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वनमंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय सोमवारी येथे झाला. खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. त्या बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनील शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील उपस्थित होते.मंडलिक म्हणाले, वन्यप्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीवित व पीक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई होण्याची गरज आहे.चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत नागरी वसाहतींमध्ये हत्ती फिरत असल्याने तातडीने उपाययोजना व्हाव्यात याकरिता आजरा तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठविणे व कर्नाटकातून चंदगडमध्ये येणारे हत्ती यांचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे, हत्ती, गवे व इतर जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान बाजारभावाप्रमाणे देणे असे महत्त्वाचे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले. यासाठी समन्वय करण्याची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्यावर सोपविण्यात आली.बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठविणे.
- कर्नाटकातून येणाऱ्या हत्तींना रोखण्यासाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे-गुडवळे चंदगड येथे वायर फ्लेमिंग करणे
- तमिळनाडूच्या धर्तीवर उपाययोजना राबवाव्यात
- शेतीमालाचे होणारे नुकसान बाजारभावाप्रमाणे मिळण्यासाठी पाठपुरावा