लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राजकीय नैतिकता म्हणून जिल्हा परिषदेत आलो नाही, याचा अर्थ अज्ञातवासात गेलो, असा होत नाही. आगामी काळात जिल्हा परिषदेमधील भ्रष्टाचाराविराेधात आवाज उठवून अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या एजंटांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. कर्मचाऱ्यांमध्ये काही टोळके तयार झाले असून, त्यांच्यामुळे सामान्य माणसांची आडवूक होते, ती खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भोजे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर मंगळवारी ते जिल्हा परिषदेत आले. भोजे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस व न्यायालयाच्या संपर्कात होतो. वीस दिवसांत पोलिसांची नोटीस नाही; अथवा फोन नसल्याने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालो. अज्ञातवासात नव्हतो आणि जाण्याचे कारणही नाही. चळवळीत काम केेलेला कार्यकर्ता आहे, जोपर्यंत न्यायालय जामीन देत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेत येणे योग्य नव्हते, म्हणून आलो नाही. यापुढेही जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात आपण लढतच राहू. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग अधिकारी करत आहेत, हे यापुढे सहन करणार नाही. जिल्हा परिषदेत एक टोळके झाले असून, त्यांच्या माध्यमातून गेले तरच काम होते, हे यापुढे चालणार नसून त्यांचा बंदोबस्त केला जाईल. यावेळी ज्येेष्ठ सदस्य अरुण इंगवले, शिक्षण सभापती प्रवीण यादव, विजया पाटील, विजय बोरगे, राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, विशांत महापुरे, राहुल देसाई, सरदार मिसाळ आदी उपस्थित होते.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार
जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची कामे होत नाहीत. त्यांच्यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेणार आहे. त्यांच्याकडून तक्रारी गोळा करून त्यांचा निपटारा केला जाईल. त्याची सुरुवात २३ मार्चला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीददिनी करणार असल्याचे भोजे यांनी सांगितले.