कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करणाऱ्या मंडळांसह इराणी खणीमध्ये गणेशमूर्र्ती विसर्जित करणाऱ्या मंडळांना व गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना महापालिकेकडून इराणी खणीजवळ सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त पी. शिवशंकर होते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव नियोजनाबाबत आयुक्त शिवशंकर यांनी आयुक्त कार्यालय पोलिस विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीमध्ये गणेशोत्सवामध्ये विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.महापालिकेकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंडप, काहिली, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व वैद्यकीय व्यवस्था, ट्रॉली जादा संख्येने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय मंडळांनी यंदा दहा फुटांवरील गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करण्यात यावे, यासाठी आवाहन करण्यात आले. ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महापालिकेतर्फे तीन मशिन्स पोलिसांना देण्यात येणार आहे. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. आणखीन आवश्यकता असल्यास कॅमेरे वाढविण्यात येतील. सार्वजनिक मंडळांना परवानगी देताना रस्ता संपूर्ण बंदिस्त न करता अॅब्युलन्स आणि फायर फायटर गाडी जाईल याची दक्षता घेणेबाबत मंडळांना सूचना करा. यासाठी वॉर्ड आॅफिस व पोलिस विभाग यांनी संयुक्त फिरती करून याची अंमलबजावणी करावी. ही कारवाई गणेश चतुर्थीपूर्र्वी करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त शिवशंकर यांनी केल्या. उत्सवाच्या काळात महापालिकेच्या दवाखान्यात अत्यावश्यक सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात. तांबट कमान ते इराणी खण येथील रस्त्याचे काम सुरू आहे ते अनंत चतुर्दशीपूर्वी पूर्ण करावे, विसर्जन मिरवणुकीवर स्वागत मंडप उभारण्यास जागा निश्चित करताना प्रथम राष्ट्रीय पक्षांना व नंतर इतर पक्षांना ड्रॉद्वारे वितरीत करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, तहसीलदार उत्तम दिघे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, तानाजी सावंत, अनिल देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण प्रमुख पंडित पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंडळांकडून बक्षिसाची रक्कम स्मशानभूमीस दानपोलिस दलाकडून गणेशोत्सव २०१५ च्या गणराया अवॉर्ड स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मिळालेली रोख रक्कम कोल्हापुरातील चार मंडळांनी महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस दान केली. रक्कम थोडीच असली तरी या चार मंडळांनी एक चांगला आदर्श समाजाला घालून दिला. त्याबद्दल आयुक्त पी. शिवशंकर यांनी या मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.केशवराव भोसले नाट्यगृह येथे नुकताच गणराया अवॉर्ड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यामध्ये विजेत्या सार्वजनिक मंडळांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम वितरित करण्यात आले. विजेत्या चार मंडळांनी बक्षिसाची रक्कम सहा हजार रुपये आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे स्मशानभूमीसाठी सुपूर्द केली.सबा बावडा मेन रोड येथील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ (प्रथम क्रमांक - रु. २०००), व्यापारी पेठ येथील शाहूपुरी युवक मित्रमंडळ (द्वितीय क्रमांक - रु. १५००), माळ गल्ली कसबा बावडा येथील जयभवानी तालीम मंडळ (द्वितीय क्रमांक - रु. १५००) व शाहूपुरी चौथी गल्ली येथील पाच बंगला मित्रमंडळ (तृतीय क्रमांक - रु. १०००) यांनी रक्कम दान केली. रक्कम किती आहे, यापेक्षा कशा प्रकारे मदत करू शकतो, हेच या मंडळांनी दाखवून दिले. म्हणून मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
मूर्तिदान करणाऱ्या मंडळांचा होणार गौरव
By admin | Published: August 30, 2016 12:53 AM