कोल्हापूरात रंगला म्हशींचा रोड शो
कोल्हापूर : परंपरेनुसार हलगी-घुमक्याच्या ताल, शिंगांना मोरपिस, पायात चांदी-सोन्याचा तोडा व कवड्यांच्या माळेने सजलेल्या म्हशींनी मंगळवारी डौलदार रोड शो केला. निमित्त होते सम्राट नगर येथील सागरमाळ येथेही सागर देवाचा उत्सवाचे.
या परिसरातील मंदिरात भाऊबीज दिवशी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी म्हशी व रेड्यांना पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाचविणे, त्यांना एका हाकेत किंवा शिट्टी तसेच वेगवेगळे आवाज काढून बोलविणे असे कसब पाहण्याची संधी लोकांना मिळाली.
शहरातील पेठांसह आसपासच्या ग्रामीण भागातील म्हशींचा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. शाहू महाराज यांच्या काळात सुरु झालेल्या या स्पर्धेला आज नवे रुप मिळाले आहे.गायी-म्हशींसह मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण. दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेच्या दिवशी गाई-म्हशी व इतर मुक्या जनावरांचे पूजन करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे.
राजकीय संदर्भ
दिवाळी पाडव्याला म्हशींना सजविण्यासाठी येथील गवळी व्यावसायिकांत यंदाही ईर्षा राहिली. म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढच होती. शिंगे लाल रंगाने रंगवून परिसरातील सर्व म्हशी एकत्र आणल्या गेल्या.काही म्हैशींच्या अंगावर सध्याच्या राजकीय आणि सामाजिक संदर्भ असणारे मजकूर लिहिण्यात आला होता.