बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता रेशीम जिल्हा व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा एक उद्योग’ या योजनेतून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगांचे नवीन दालन उभे करणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. खा. माने हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, आलास, गणेशवाडी आदी गावांत खासदार माने यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पूरबाधित गावातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासाठी रस्त्यांची उंची वाढविणे, क्षारपड जमिनीमध्ये बांबूचे उत्पादन घेणे, आधुनिक शेतीचे उपक्रम घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच गावनिहाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी औरवाडचे सरपंच अशरफ पटेल, उपसरपंच नितीन शेट्टी, आबिद पटेल, जयवंत मंगसुळे, मुश्ताक पटेल, बाळासाहेब रावण, विजय नंरदे, आय. आय. पटेल, राहुल काकडे, साहेबपाशा पटेल, किरण कांबळे, इरफान चौगुले, आलम पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.