चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. या वेळी बदलत्या राजकीय समीकरणांचा चंदगड तालुक्याच्या पदरी एक सभापतिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने नेमकी माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे.
‘गोकुळ’च्या राजकारणामुळे चंदगड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदली आहेत. सध्या तालुक्यात मूळचे भाजप आघाडीतील व सध्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गोटातील विद्या विलास पाटील, कल्लाप्पा भोगण तर, आमदार राजेश पाटील समर्थक अरुण सुतार, भरमू पाटील गटाचे सचिन बल्लाळ कार्यरत आहेत. त्यातच भाजपच्या गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना ‘सतेज’ टीम जोड आहे.
तसेच यामध्ये गडहिंग्लजमधील एका नेत्याचा पाठिंबा असल्याने माजी आमदार व्ही. के. पाटील यांच्यानंतर तालुक्यात पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे. ते पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ठेवण्यासाठी व काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला पुष्टी देण्यासाठी या वेळी सभापतिपदाच्या रूपाने आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. यामध्ये विद्या पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांचे पती कल्लाप्पा भोगण यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते.
कल्लाप्पा भोगण यांना संधी दिल्यास आपण पूर्ण क्षमतेने काम करू असा निरोपच विलास पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेकवेळा शिष्टमंडळासह पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली आहे.
आमदार राजेश पाटील यांनीही जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्यासाठी तर, भरमूअण्णा पाटील बल्लाळ यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
चौकट :
सतेज टिम सक्रिय भोगण यांना संधी मिळाल्यास त्यांच्या रूपाने चंदगड तालुक्यातील काँग्रेसच्या गटाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि. प. पदाधिकारी निवडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘सतेज’ गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत.