खोची : शेती ही निसर्गावर अवलंबून असते. नैसर्गिक वातावरणाने साथ दिल्यास पिके उत्तम येतात. शेतकरी प्रचंड कष्टाने शेती पिकवितो. हातकणंगले तालुक्यातील शेतकरी विविध पिके घेऊन नावीन्यपूर्ण शेती करतात. या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. त्यांच्या अडचणी सोडवून सहकार्य करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
लाटवडे येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार आवळे यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
जनार्दन पाटील (सर) म्हणाले, गारपिटीमुळे गतवर्षी ऊसशेती व भाजीपाला, फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार राजू आवळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई लाटवडे गावातील शेतकऱ्यांना मिळाली.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, शामराव वाघमारे, सुरेश पाटील, गणपती काटकर, विजय पाटील, तानाजी कोळी, बाजीराव सातपुते, डॉ. विजय गोरड, शकील अत्तार, अरुण पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार राजू आवळे यांचा सत्कार लाटवडे येथील शेतकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पाटील यांनी केला. यावेळी जनार्दन पाटील(सर), शामराव वाघमारे, गणपती काटकर, सुरेश पाटील, विजय पाटील, तानाजी कोळी, बाजीराव सातपुते उपस्थित होते.(छाया - आयुब मुल्ला)