लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्रावण म्हणजे भगवान श्री शिवशंकराच्या उपासनेचा महिना. या महिन्याभरात शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते, दुसरीकडे मराठी संस्कृतीतील नागपंचमी, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारख्या सणांची रेलचेल असते. आता या श्रावणोत्सवाला महिना राहिल्याने यंदा तरी देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार की नाही, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. या मंदिरांवर जगणे अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही शासनाने आता मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.
आषाढात गावोगावीच्या जत्रा, माही आणि श्रावण म्हणजे सण, उत्सव, धार्मिक विधी, व्रतवैकल्यांचा महिना. मराठी संस्कृतीत श्रावणाला विशेष महत्त्व असून, हा देवदेवतांच्या उपासनेचा कालावधी मानला जातो. यातही भगवान शिवशंकराच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आणि सध्या दुसरी लाट सुरू असल्याने सलग दुसऱ्यावर्षी सगळीच मंदिरे बंद आहेत. भाविकांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेता येत नाही, आता जिल्ह्यातील संसर्गाची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली असली तरी त्याचा वेग फार कमी आहे. त्यामुळे एक महिन्याने मंदिरे भाविकांसाठी खुली होतील का, हे त्यावेळच्या कोरोनास्थितीवरच अवलंबून आहे.
---
शिवशक्तीचे स्थान
कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने येथे सर्वाधिक शिव मंदिरे आहेत, अंबाबाईच्या मूळ मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहेच शिवाय बरोबर वरच्या मजल्यावर मातृलिंग आहे. शहरातही कपिलेश्वर, अतिबलेश्वर, उत्तरेश्वर, वटेश्वर, ऋणमुक्तेश्वर, कैलासगडचे स्वारी मंदिर, वडणगे तसेच पंचगंगा नदी घाटावरही शिव मंदिरे आहेत. त्यामुळे श्रावणात या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.
---
श्रावण सोमवार असे
पहिला : ९ ऑगस्ट, दुसरा : १६ ऑगस्ट, तिसरा : २३ ऑगस्ट, चौथा : ३० ऑगस्ट पाचवा : ६ सप्टेंबर
---
९ ऑगस्टपासून श्रावण
यंदा ९ ऑगस्टपासून श्रावण सुरू होत असून, त्याचदिवशी पहिला श्रावण सोमवार आहे, तर अमावास्यादेखील सोमवारी आहे. त्यामुळे यंदा या महिन्यात पाच सोमवार आहेत. त्याशिवाय १३ ऑगस्टला नागपंचमी, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन, २२ ऑगस्टला राखी पौर्णिमा, ३० ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सण आहेत.
----
व्यावसायिक म्हणतात...
तीन महिने होऊन गेले तरी मंदिरे बंद आहेत, पूजा साहित्याच्या विक्रीवरच आमचं कुटुंब अवलंबून आहे. कर्ज काढून घर चालवतोय. शासन अन्य व्यवसाय, उद्योगांचा विचार करत आहे पण मंदिरावर अवलंबून असलेल्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांचं काय होणार, याचा विचार करुन नियमांचे पालन करत मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे.
- राजू निकम (पूजा साहित्य विक्रेता)
--
श्रावणात मंदिरांमध्ये भाविक येतात, त्यामुळे उलाढाल होते. दुकाने बंद होऊन आता १०० दिवस होत आले. शहरात अंबाबाई मंदिर आणि परिसरातील मंदिरांवर १० हजार कुटुंब अवलंबून आहेत, ज्यांचा आणखी एखादा व्यवसाय आहे त्यांचे ठीक आहे पण ज्यांचा उदरनिर्वाह मंदिरामुळे चालतो अशा कुटुंबांचे काय, याचाही विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा..
- हर्षदा मेवेकरी (व्यावसायिक)
-----