कोल्हापूर : बंद पडलेल्या बँकांत पतसंस्थांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकलेल्या आहेत. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी केले.
फेडरेशनच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, पतसंस्थांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नियामक मंडळाची स्थापना झाली असून, त्यांच्या जाचक अटींमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. या जाचक अटी रद्द करण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे. प्राधिकरण निवडणूक निधी म्हणून पतसंस्थांकडून पैसे भरून घेते, त्याला सर्वांचा विरोध असून, पूर्वीप्रमाणे ही प्रक्रिया राबवावी, अशी मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील, डी. जी. पाटील, सुधाकर पिसे, एम. के. चौगुले, एम. एस. पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. संचालक प्रा. सुनील भोसले यांनी स्वागत केले. व्यवस्थापक दीपक पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. राजेश केसरकर यांनी आभार मानले.
फोटो ओळी : जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनच्या सभेत अध्यक्ष शंकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनिल पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-२२०२२०२१-कोल-पतसंस्था)