आयुब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : गेल्या सतरा वर्षांपासून संचालकपदापासून उपेक्षित असणाऱ्या हातकणंगले तालुक्याला गोकुळच्या आगामी निवडणुकीत तरी संधी मिळणार का? असा सवाल दूध उत्पादकांमधून विचारला जात आहे. गोकुळचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आहे. मात्र, संचालक पद नाही, अशी विचित्र अवस्था हातकणंगले तालुक्याची झाली आहे.
जिल्ह्याच्या मुख्य संस्थांची सर्व सूत्रे कित्येक वर्षे हातकणंगले तालुक्यातून हलविली जात होती. मात्र, गेल्या एक दीड दशकात ही परिस्थिती बदलत गेली. तालुक्याचा वरचष्मा कमी होत गेला. वसंतराव मोहिते, अरुण इंगवले यांच्यानंतर गोकुळसारख्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या संस्थेच्या संचालकपदापासून गेल्या सतरा वर्षांपासून तालुक्याला दूर राहावे लागले आहे. सभासद संख्या कमी असणे, हे यासाठी कारण पुढे येत असले तरीसुद्धा पट्टीचे राजकारण, सहकाराचे जाळे असतानाही पद मिळणे मुश्कील झाले आहे. तालुक्यात मतदानास पात्र ९६ संस्था आहेत. संघास तालुक्यातून सुमारे साठ हजार लीटर दूध संकलन होते. गेल्या तीन वर्षांत संकलनात तिपटीने वाढ झाली आहे. सुमारे दीडशे संस्था संलग्नित झाल्या आहेत. संस्था, उत्पादक यांच्या विविध समस्या असतात. संघाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करावयाची असते. त्यादृष्टीने काही अडचणी येतात. त्या ताकदीने सोडविण्यासाठी हक्काच्या संचालकाची गरज आहे. शिफारसीसाठी अन्य तालुक्यातील संचालकांकडे जावे लागते. त्यामुळे संस्थाचालक, कर्मचारी यांची कसरत होत आहे.
यासाठी तालुक्याला संचालकपद द्या, अशी मागणी अनेक वर्षांपासून संस्था चालक नेत्यांकडे करीत आहेत.
.............
अमल, आवाडे, इंगवले यांच्या नावाची चर्चा
नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ताधारी गटातून जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, अरुण इंगवले यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार अमल महाडिक यांचेसुद्धा नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विरोधी गटात मात्र अद्याप शांतता आहे.
............
तालुक्यात संकलन वाढीस वाव
जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता दूध संकलन भविष्यात वाढवण्यास सर्वच तालुक्यांत मर्यादा आहेत; परंतु हातकणंगले तालुका याला अपवाद आहे. कारण दोन्ही बाजूंनी नद्या व उसाचे वाढलेले क्षेत्र याचा विचार करता तालुक्यातून दूध संकलन वाढवण्यास वाव आहे. त्याचा लाभ संचालकपद दिले तर चांगल्या पद्धतीने होणार आहे.