घनश्याम कुंभार
यड्राव : शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी कडक होण्याऐवजी ग्रामस्थांचा रस्त्यावरील बिनधास्त वावर चिंताजनक आहे. या लोकांवर कारवाई करण्यास अनास्था दाखवत आहे, की हतबल बनले आहे. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक होणार का, हा संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असल्याने व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने शासनाला उपाययोजना करणे भाग पडले आहे. त्यास अनुसरून पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला.
त्यातील नियमांबाबत संभ्रम असतानाच नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्यावर बिनधास्तपणे वावरत आहेत.
यड्राव हा औद्योगिक परिसर असल्याने इचलकरंजी शहराचा एकजीव झालेला भाग आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण, उद्योग यासह विविध कारणांसाठी या परिसरातून लोकांची वर्दळ, तर सांगली- मिरजकडून कर्नाटक राज्याकडे जाण्यास हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर नागरिकांची रहदारी मोठी आहे.
इचलकरंजी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर यड्राव, खोतवाडी या परिसरात रुग्णसंख्या ही हातावर मोजण्याइतकी असली तरीही परिसरातील लोकांचा शहराशी असलेला संपर्क यामुळे रुग्ण संख्या वाढू नये, ही काळजी घेणे आवश्यक आहे.
यड्राव फाटा येथे पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला आहे; परंतु याठिकाणी बिनधास्त फिरणाऱ्यांची चौकशी होताना दिसत नाही. अशा वर्दळीमुळे कोरोनाची चेन ब्रेक होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेस ग्रामस्थांसह प्रशासन गांभीर्य दाखवत नाही, हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते व कोरोना रोखण्यासाठी शासनाने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांना खीळ बसविण्यास सर्व जण जबाबदार ठरू शकतात.
फोटो - २००४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
यड्राव (ता. शिरोळ) येथील यड्राव फाटा येथे पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असतानाही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. (छाया : घनश्याम कुंभार)