कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात तालिबानी, नक्षलवादी निर्माण होण्यास प्रवृ़त्त करणार आहे का असा उपरोधिक असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका अनेक घटकांना बसला आहे. यातूनच अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा मानसिकतेमुळे नक्षलवादी निर्माण होण्याचा धोका असतो. निराशा आणि असंतोषामुळेच गांजा लावण्याची परवानगी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
महापूरग्रस्तांच्या वाढीव भरपाईसाठी आणि नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळावे, यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढल्यानंतरही सरकारकडून हालचाली नाहीत. १ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजता प्रयाग चिखलीतील दत्त मंदिरात अभिषेक घालून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून जाईल. यात्रा ५ सप्टेंबरला दुपारी नृसिंहवाडीत पोहचेल. तिथे पंचगंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यासह जलसमाधी आंदोलन होईल. पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
झाडाला लटकलेला शेतकरी
केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनचा क्विंटलमागे चार हजारांनी दर कमी झाला. याचा मोठा आर्थिक फटका राज्यातील सोयाबीन उत्पादकांना बसणार आहे. अशाप्रकारे शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यास शिवारातील झाडाला लटकवून आत्महत्येस प्रवृत्त करायचे की चांगला भाव मिळवून देऊन खुश झालेल्या शेतकऱ्यांना पाहायचे, हे सरकारने ठरवण्याची वेळ आली आहे असे, शेट्टी यांनी सांगितले.