कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील थकबाकीपोटी कोणाचीही घरगुती वीज खंडित केली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी दिली. हा राज्याचा प्रश्न असल्याने ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याच्या मागणीबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा, या मागणीसाठी सोमवारी वीज बिल कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता निर्मळे यांची भेट घेतली. अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा सक्ती करत आहे. मोबाईलवरून नोटीस पाठवून वीज बिल भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणतात. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही, असे महावितरणला कळविलेले आहे.
तरीही सक्ती करणार असाल तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा करून मीटिंग घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असताना महावितरणने गडबडीने वसुली सुरू करणे योग्य नाही. यामुळे महावितरण कर्मचारी व ग्राहकांमध्ये संघर्ष होईल, असेही पाटील-किणीकर यांनी सांगितले.सहा महिन्यांचे बिल सोडून १ ऑक्टोबरपासून नवीन बिले द्या, अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली. याबाबत ऊर्जामंत्र्यांशी मीटिंग घडवून आणावी, असे सांगत वीज पुरवठा खंडित केला तर होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा निवास साळोखे यांनी दिला. यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.