उर्वरित ऊसाची बिले आठवडाभरात देणार
वारणानगर : ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पहिला वारणा साखर कारखाना असून येत्या गळीत हंगामामध्ये इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू गळीत हंगामातील राहिलेली ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक बिले येत्या आठ-दहा दिवसांत देणार असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सभेत सांगितले.
येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी वारणा विभाग शिक्षण संकुलातील सभागृहात दुपारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.
आमदार कोरे म्हणाले, गेल्या सहा-सात वर्षांत वारणा कारखान्यावर आर्थिक अरिष्टे आली. अशा काळातही एफआरपीपेक्षा जादा दर ऊस उत्पादकांना देण्याची परंपरा कायम राखली. केंद्र व राज्य शासनाची विविध कर्जे, त्यांची व्याजे यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत सभासद व कर्मचाऱ्यांनी कारखाना माझा, मी कारखान्याचा ही भूमिका ठेवून काम केल्याने यावर्षी साडे नऊ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करू शकलो. संपलेल्या गळीत हंगामातीन ऊस बिले आर्थिक वर्षअखेरीमुळे लांबणीवर पडली. मात्र, येत्या आठ-दहा दिवसांत ही उर्वरित सर्व बिले देणार आहे. ४४ मेगावॅटचा व ३२० कोटी रुपयांचा असणाऱ्या ऊर्जांकूर प्रकल्पाचे कर्ज फक्त ४० कोटी रुपये शिल्लक असून लवकरच हा प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी नोटीस वाचन केले तर सचिव बी. बी. दोशिंगे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला.
सभेस वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कारखान्याचे सर्व संचालक व समुहातील संचालक, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील (नागांव ) यांनी आभार मानले तर प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी.....
वारणा साखर कारखान्याच्या ६४ व्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत, संचालक रावसाहेब पाटील, गोविंदराव जाधव, सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, एच. आर. जाधव आदी उपस्थित होते.
फोटो - ०८ वारणा कारखाना सभा