राम मगदूम - गडहिंग्लज -मंडईव्यतिरिक्त इतरत्र भाजी विक्रीस बंदी घालावी, अशी मंडईतील भाजी विक्रेत्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अनेकवेळा तोंडी व लेखी मागणी करूनदेखील पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच मंडईतील व्यापारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून, शहरातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.पाच वर्षांपूर्वी नगरपालिकेने भडगाव रोडवरील आरक्षण क्रमांक १४ मध्ये सुसज्ज भाजी मंडई बांधली. त्याठिकाणी होलसेल भाजी मार्केटसाठी स्वतंत्र इमारतदेखील बांधण्यात आली आहे. याठिकाणी लाखो रुपये गुंतवून भाजी विक्रेत्यांनी दुकान गाळे घेतले आहेत. मात्र, अपेक्षित व्यापारच होत नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.पूर्वी शहरातील लक्ष्मी रोडवरील दोन्ही बाजूस बसून भाजी विक्रेते व्यवयास करीत. आजूबाजूच्या खेड्यांतील शेतकरीही याच ठिकाणी बसून भाजी विकत. वाहतुकीची कोंडी होऊ नये व एकाच ठिकाणी सर्व प्रकारची भाजी ग्राहकांना उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने स्वतंत्र भाजी मंडई बांधली.शहरातील इतर ठिकाणी भाजी विक्रीस बंदी घालण्याचे आश्वासन पालिकेने मंडईतील विक्रेत्यांना दिले होते. त्यानुसार काही दिवस लक्ष्मी रोडसह शहरात अन्यत्र भाजी विक्रीस प्रतिबंध करण्यात आला. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शेतकरी व काही भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने पुन्हा लक्ष्मी रोडवरच थाटली आहेत. त्यामुळे मंडईतील व्यापारावर परिणाम होऊन भाजी विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे. यासंबंधी वेळोवेळी पालिकेकडे व्यथा मांडली. मात्र, तात्पुरत्या मलमपट्टीपलीकडे काहीच झाले नाही, अशी त्यांची भावना झाली आहे.अन्याय होऊ देणार नाहीमंडईतील गाळेधारकांसह अन्य भाजी व्यापारी व शेतकऱ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शहरात इतरत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मंडईत हलविले जाईल. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, भाजी विक्रेत्यांनी पालिकेला सहकार्य करावे.- लक्ष्मी घुगरे, नगराध्यक्षा, गडहिंग्लज.पालिकेने आश्वासन पाळावेकोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने भाजी मंडई बांधली आहे. आम्ही कर्ज काढून त्याठिकाणी गाळे घेतले आहेत. शहरात इतरत्र भाजी विक्री सुरू असल्याने भाजी मार्केट निम्मे रिकामे आहे. श्रेष्ठी विद्यालय ते आजरा रोड, वीरशैव बँक ते नेहरू चौक आणि नेहरू चौक-लक्ष्मी रोड ते टिळक पथ, पाण्याची टाकी या झोनमध्ये भाजी विक्रीस बंदी घालण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. मात्र, ते पाळले जात नाही. - रावसाहेब गार्इंगडे, सचिव छ. शिवाजी महाराज भाजी मार्केट संघटना गडहिंग्लज.
भाजीवाल्यांचा प्रश्न चिघळणार ?
By admin | Published: December 25, 2014 11:40 PM