कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज, शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने हा दौरा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यानच, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र या दौऱ्यावर येणाऱ्या गांधी यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. महाडिक यांनी तर शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो पण शिवपुतळा अनावरण करण्यासाठी येणारे गांधी आमच्या प्रश्नांची उत्तरे देणार का अशी विचारणा केली आहे.हे विचारले प्रश्न
- हिंदू धर्माची, संस्कृतीची निंदा नालस्ती आणि टिंगल करणाऱ्या, देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या गॅंगसाठी राहुल गांधी आदर्श आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी औरंगजेब, आदिलशाही, मोगलशाही यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला. पुरोगामित्वाच्या नावाखाली, हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही हे राहुल गांधी यांना मान्य आहे का ?
- अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात नाच गाणी करण्यात आली, असा तद्दन घाणेरडा आणि खोटा आरोप राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत केला होता. त्याबद्दल राहुल गांधी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत का ?
- लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी, हिंदू म्हणजे असत्य, हिंदू म्हणजे हिंसा अशी विधाने केली होती. हिंदू धर्माचा इतका द्वेष करणाऱ्या राहुल गांधी यांना, हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याची खरोखर इच्छा आहे का ? की केवळ राजकारणासाठी राहुल गांधी हे ढोंग करत आहेत?
- स्वामी समर्थांचा अपमान करणाऱ्यांना माफी मागायला लावणार का?
- केवळ मतांसाठी विशाळगडावरील अतिक्रमणे पाडण्यास विरोध करणाऱ्यांना ते माफी मागायला लावणार का?