मुरलीधर कुलकर्णी ।कोल्हापूर : असह्य वेदनांमुळे ती चालू शकत नाही. तिचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली पूर्णपणे वाकलेला असल्याने तिला धड उभेही राहता येत नाही. कोणती तरी दाक्षिणात्य भाषा अतिशय क्षीण आवाजात ती बोलत असल्याने ती नेमकी काय म्हणते ते कळत नाही. केवळ खाणाखुणांनीच तिच्याशी संवाद साधावा लागतो. गेल्या दोन वर्षांपासून या अनोळखी वृद्धेचा सांभाळ संभाजीनगरमधील माउली केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे. राहुल आणि दीपक कदम हे दोघे भाऊ तिची सेवा करतात.
दोन वर्षांपूर्वी जोतिबा डोंगरावर विमनस्क अवस्थेत ती सापडली. पाय अधू असल्याने तिला हालचालही करता येत नव्हती. अत्यंत क्षीण आवाजात ती कोणत्या तरी विचित्र भाषेत बोलत होती; पण तिचा आवाज खूपच खोल गेल्याने ती काय म्हणतेय ते कळत नव्हते. येणारे भाविक तिला काहीतरी खायला द्यायचे. या अन्नावरच तिची गुजराण सुरू होती. यासंबंधीची माहिती काही सहृदयी लोकांनी कदम बंधूंना दिली. या दोघांनी तिला रुग्णवाहिकेतून त्यांच्या ‘माउली’ केअर सेंटरमध्ये आणले. इथे तिची सेवासुश्रुषा करण्यात आली; पण तिचे पायाचे दुखणे अद्यापही तसेच आहे. एखाद्या सेवाभावी रुग्णालयाने उपचार करून तिची वेदनेतून मुक्तता करावी, एवढीच कदम बंधूंची अपेक्षा आहे.भाषा कळत नसल्याने केवळ खाणाखुणांनीच संवादगेल्या दोन वर्षांपासून तिची ओळख पटविण्यासाठी कदम बंधू धडपडत आहेत. पण तिची भाषा कळत नसल्याने तिचे नाव, गाव, पत्ता काहीच कळत नाही.कोणती तरी दाक्षिणात्य भाषा अतिशय क्षीण आवाजात ती बोलत असल्याने ती नेमकी काय म्हणते ते कळत नाही. केवळ खाणाखुणांनीच तिच्याशी संवाद साधावा लागतो.माउली केअर सेंटरमध्ये राहणाऱ्या इतर वृध्दांना भेटायला त्यांचे नातेवाईक आले की तिचे डोळे पाणावतात. आयुष्याच्या संध्याकाळी डोळे मिटण्यापूर्वी आपली माणसे भेटावीत यासाठी ती आस लावून बसली आहे. पण तिची ही इच्छा पूर्ण होणार की नाही, हे सध्यातरी अनुत्तरीतच आहे.