शिरोळ : शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. ४२ आमदारांसह शिंदे गुवाहाटीत असून शिंदे यांच्या गोटात आता माजी आमदारही सामील होत आहेत. या घडामोडीत आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.नव्या राजकीय घडामोडीत माजी आमदार उल्हास पाटील कोणती भूमिका घेणार याकडे शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले होते. अखेर उल्हास पाटील यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सुरूवातीपासून आपण शिवसेनेसोबत आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून आपण आमदार झालो. आज पक्ष अडचणीत आहे. दुस-या बाजुला नेतृत्वाला आमची आवश्यकता आहे.
कार्यकर्त्यांची मते आजमावून घेणारमुळातच ज्यांच्याशी आमची लढाई आहे ते अगोदरच त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे आपण शिवसेनेसोबतच आहोत. शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते आजमावून पुढे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेशी आपण एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.