वेळ पडलीच तर खासगी इमारती घेणार : कोरोनाशी लढण्यास प्रशासन सक्रिय
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यदाकदाचित वाढलाच तर त्याला प्रतिबंध करण्याकरिता संशयित रुग्णांचे वैयक्तिक तसेच सामूहिक अलगीकरण करण्यात यावे म्हणून शहरातील खासगी इमारती घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर शहरात सुदैवाने एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ बचाव करण्याकरिता स्वत:ला ३१ मार्चपर्यंत सांभाळावे. या काळात गर्दी, सर्दी, जवळचा संपर्क टाळावा. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत म्हणून आपली मुले सार्वजनिक ठिकाणी खेळणार नाहीत. ती घरातच थांबून राहतील याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
कोरोनाशी लढण्यास महापालिका प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. घरोघरी सर्वेक्षणाबरोबरच गुरुवारपासून शिरोली, शाहू व शिये फाटा या तीन नाक्यांवर तसेच बसस्थानकावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बॅरिकेट लावून वाहने थांबविली जात आहेत. ट्रॅव्हल लक्झरी बसमधून येणाऱ्या प्रवाशांना तपासले जात आहे. पहिलाच दिवस असल्याने अनुभव येईल तशी ही क्षमता वाढविली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे. पुण्या-मुंबईहून काहीजण कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक व विद्यार्थी खुल्या मैदानावर खेळताना, बागेत फिरताना दिसत आहेत. खरे तर त्यांनी स्वत:च्या तब्येतीबरोबरच दुसऱ्यांचाही विचार करावा, अशी अपेक्षा आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. शाळेचे शिक्षक तसेच पोलिसांचे याकरिता सहकार्य घेतले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.महापालिका प्रशासनाच्या उपाययोजना
- प्रबोधनात्मक २४५ होर्डिंग लावली, १५० लावणार.
- मनपा कर्मचाºयांना २००० हात रुमाल वितरण
- आयसोलेशन हॉस्पिटलचे अद्ययावतीकरण सुरू
- आयसोलेशन हॉस्पिटलकडे दोन व्हेंटीलेटर खरेदी
- सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्स यांना प्रशिक्षण
- सर्व वरिष्ठ अधिकाºयांकडे जबाबदाºयांचे वाटप
- सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण सुरू
- नागरिकांनी आॅनलाईन तक्रारी कराव्यात. अधिकारी तुमच्याकडे येणार.
- कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे २२ डॉक्टरांचे पथक तयार.