कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा उमेदवार उद्याच, गुरुवारी ठरणार आहे. सत्तारुढ गटाच्या १८ संचालकांची बैठक त्याच दिवशी सकाळी होणार असून, त्यामध्ये नाव निश्चित केले जाणार आहे. अध्यक्ष पदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या ५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडी २१ पैकी १८ जागा मिळाल्या, तर विरोधी परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी उद्या दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे. अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून आमदार पी. एन. पाटील इच्छूक आहेत. त्यांनी तशी उघड अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वाधिक संचालक असल्याने राष्ट्रवादीचाच अध्यक्ष व्हावा, असा प्रयत्न त्यांच्या संचालकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेला प्रगतिपथावर नेल्याने पुन्हा त्यांनीच जबाबदारी स्वीकारावी, असा आग्रह बहुतांशी संचालकांचा आहे.
निवडणूक झाल्यापासून सत्तारुढ आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक झालेली नाही. पालकमंत्री सतेज पाटील हे परदेशात गेल्याने बैठक होऊ शकली नसली, तरी आमदार विनय काेरे व आमदार प्रकाश आवाडे यांनी आघाडीतील नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी होत आहेत.
उद्या, निवड होत असल्याने आज, बुधवारी संचालकांची बैठक घेऊन त्यामध्ये मते अजमावली जाण्याची शक्यता होती. मात्र, उद्या सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात नूतन संचालकांना स्नेहभोजन ठेवले असून, तिथेच नाव निश्चित करून दुपारी एक वाजता निवडीसाठी जिल्हा बँकेत जाणार आहेत. एकूणच सत्तारुढ गटातील हालचाली पाहता मंत्री हसन मुश्रीफ यांनाच अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.