राजाराम लोंढेकोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने मतदान झाले. सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने सत्ता राखण्यासाठी, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीने परिवर्तनासाठी कंबर कसली; पण कारखान्याच्या राजकारणाचा अंंडरकरंट पाहता ‘बिद्रीत परिवर्तनाला उभारी दिसत असली तरी के.पी. पाटीलच पुन्हा भारी ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.परिवर्तन आघाडीने लावलेल्या जोडण्या १०० टक्के यशस्वी झाल्या तरच काहीतरी त्यांना संधी दिसते. तीन गटांत या आघाडीचे उमेदवार सत्तारूढ गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच ए.वाय. पाटील, अर्जुन आबीटकर व बाबासाहेब पाटील हे मुसंडी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.‘बिद्री’च्या निवडणुकीत या वेळेला नेत्यांनी खांदेपालट केली आहे. गेल्या वेळेला ए.वाय. पाटील, समरजित घाटगे हे सत्तारूढ आघाडी, तर माजी आमदार दिनकरराव जाधव विरोधी आघाडीसोबत होते. पाटील, घाटगे विरोधात, तर जाधव सत्तारूढ गटासोबत गेले. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी चांगलीच हवा तयार केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए.वाय. पाटील व समरजित घाटगे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या. त्यामुळे सत्तारूढ आघाडीची पुरती दमछाक केली. आता नाहीतर कधीच नाही, या इराद्याने परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली होती.राजकारणातील सर्व नीतींचा प्रभावीपणे वापर केल्याने हवा करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे विरोधी परिवर्तन आघाडीला काहीशी उभारी मिळेल, असेच वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत सत्तारूढ आघाडीने लावलेल्या जोडण्या विशेषकरून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व भाजपचे राहुल देसाई यांनी आपापल्या गटातील मतदारांना चांगलेच जखडून ठेवले. प्रत्येकावर जबाबदारी देत त्या यशस्वी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे दोन दिवसांत हळूहळू वातावरण बदलत गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्षेत्रात कानोसा घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील हेच भारी ठरतील, असे चित्र दिसत आहे. मात्र, काही गटांत सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांची दमछाक होणार, हे निश्चित आहे. यामध्ये ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबीटकर, बालाजी फराकटे हे मुसंडी मारू शकतात.
अफवांचा झटका..
निवडणुकीत शेवटपर्यंत एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर आघात करण्याची एकही संधी दोन्ही आघाड्यांनी सोडली नाही. अफवा पसरवून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही झाला, अफवा आणि वस्तुस्थितीचा परिणाम किती खाेलवर गेला, यावरच निकाल अवलंबून आहे.सतेज पाटील यांच्या जोडण्या..आमदार सतेज पाटील हे आतापर्यंत करवीरमध्ये एक उमेदवार देऊन फारसा भाग घेत नव्हते. मात्र, या वेळेला पाच जागा घेतल्याच; पण त्याबरोबरच सत्तारूढ पॅनलची धुरा खांद्यावर घेऊन अगदी योग्य पद्धतीने जोडण्या लावल्या आहेत. या जोडण्याच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणार, असा सूर उमटत आहे.