गणपती कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : सध्या ग्रामपंचायत निवडणूक धुमशान सुरू आहे. गावागावातील गटनेता ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी विरोधकांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी विरोधी उमेदवाराच्या भावकीतीलच उमेदवार देऊन काट्याची लढत करण्याची रणनीती सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकीचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
गावच्या ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता आहे यावरच तालुका, जिल्हा पातळीवर त्या गटनेत्यांचे राजकीय वजन ठरत असते. त्यामुळे स्थानिक गटनेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता असावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते.
निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर समविचारी गटांशी युती जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे गटनेत्यांनी प्रभागनिहाय आरक्षणानुसार उमेदवारांचा शोध घेत आहेत. विरोधी गट कोणता उमेदवार देतात, त्यावर तोडीस तोड म्हणून विरोधी उमेदवाराच्या भावकीतीलच सक्षम उमेदवार शोधून कडवे आव्हान निर्माण केले जात आहे.
मूळातच देवाण-घेवाण, शेतजमीन बांधाच्या वादातून नात्यात तेढ निर्माण झालेली असते. त्याच वादाचा राजकीय नेतेमंडळी फायदा उठवित परस्परविरोधी उमेदवार देऊन नात्यात ईर्षा निर्माण केली जात आहे. राजकीय नेत्यांना भावकीतील वादाचे सोयरसुतक नसते. त्यांना केवळ उमेदवार निवडून आणणे व ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व अबाधित राखणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. त्यामुळे भावकीतील वाद वाढू नये याची दक्षता उमेदवारांनीच घेण्याची गरज असून ग्रामपंचायत निवडणूक गटनेत्यांची प्रतिष्ठा भावकीच्या नात्यातील वादाला खतपाणी घालणारी ठरत आहे.