संदीप बावचे -- जयसिंगपूर-अनुत्पादित तंबाखूवरील मूल्यवर्धित साडेबारा टक्के कराचा प्रश्न सोडविण्याबाबत एक वर्षानंतर पुन्हा अर्थ व नियोजन मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे़ यामुळे आश्वासनांचा हा पूर केव्हा ओसरणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे़ येत्या अर्थसंकल्पातून हा कर हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिल्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे व्यापारांच्या नजरा आता येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत़तत्कालीन आघाडी शासनाने अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर प्रस्तावित केला होता़ हा कर जयसिंगपूर शहरातील तंबाखू पेठेचे अस्तित्व पुसून टाकणारा ठरला़ गेल्या तीन वर्षांपासून अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के कराचा प्रश्न भिजत पडला आहे़ १९७१ पासून तंबाखू व इतर शेतीमालाच्या व्यवसायासाठी शहरातील व्यापारी पुढे आला़ यामुळे तंबाखू पेठेसह शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. कर्नाटक सीमाभागातील बहुतेक शेतकरी जयसिंगपूरमध्ये तंबाखू घेऊन येतो. येथील व्यापारी हा तंबाखू गेल्या नऊ दशकापासून देशभरातील विक्रेत्यांकडे पाठवितात, तर या व्यवसायावर १००० माथाडी कामगार, ५००० महिला कामगार, १०० बैलगाडी वाहतूकदार अवलंबून आहेत़ व्हॅटमुळे तंबाखू उद्योगातील महिला, हमाल, गाडीवान यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही शासनाच्या लक्षात आणून दिले होते़ अनुत्पादित तंबाखू कराचा प्रश्न ‘जैसे थे’च असल्यामुळे प्रक्रिया केलेला तंबाखू पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर पेठेचे अस्तित्व मूल्यवर्धित करामुळे जवळपास संपुष्टात आले आहे़ येथील तंबाखू पेठेवर घाला घालणारा हा कर रद्द करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या प्रतिनिधींना अनेकवेळा साकडे घातले आहे़ मात्र, आत्तापर्यंत आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेले नाही़तंबाखूवरील मूल्यवर्धित कर येत्या अर्थसंकल्पातून हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी एक वर्षापूर्वी दिले होते़ त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील यांच्या स्वतंत्र शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी कर प्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते़ गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे़ यामुळे व्हॅटप्रश्नी शासन कशाप्रकारे हा प्रश्न सोडवून व्यापाऱ्यांना दिलासा देते याकडे लक्ष लागून राहिले आहे़‘व्हॅट’चा प्रश्न सुटणार का?तंबाखूवरील मूल्यवर्धित कर येत्या अर्थसंकल्पातून हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी दिल्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे जयसिंगपुरातील व्यापाऱ्यासह या घटकावर अवलंबून असणाऱ्या कामगार वाहतूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे़ यावेळी तर हा प्रश्न सुटणार का, की तो पुन्हा लांबणीवर पडणार. ‘व्हॅट’मुळे येथील व्यापारी कर्नाटकात हा व्यवसाय स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत़ यामुळे सुमारे दहा हजार लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे़ शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेला हा व्यवसाय शासनाने मोडीत काढू नये़ व्हॅटप्रश्नी निर्णय घेऊन कामगारवर्गाला दिलासा द्यावा़ - कॉ़ रघुनाथ देशिंगे
तंबाखू कराची आश्वासनपूर्ती होणार का?
By admin | Published: March 13, 2016 11:29 PM