कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, रविवारी दुपारी एक वाजता आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे होत आहे. बॅँकेच्या ताळेबंदावरून विरोधक आक्रमक झाले असून, सभा शांततेत चालविण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. मागील वादळी सभेची परंपरा खंडित करण्याचे आव्हान अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्यासमोर आहे. गेली सभा राज्यात गाजली. हाणामारीमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे यावर्षी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधक सावध आहेत. मागील सभेची पुनरावृत्ती करायची नाही, याबाबत सत्तारूढ व विरोधक सहमत असले तरी ताळेबंदावर जोरदार चर्चा होणार हे नक्की आहे. विषयपत्रिकेवर नियमित विषयांबरोबरच कर्ज वितरणाबाबत पोटनियम दुरुस्ती ठेवली आहे. मागील दोन वर्षांत आवश्यक तरतुदी न केल्याने त्यावेळी नफा फुगला. त्या तरतुदी आता केल्याने या वर्र्षीचा नफा घटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे; तर पारदर्शक कारभार केल्यानेच बॅँक नफ्यात आल्याचा दावा सत्तारूढ गटाने केला आहे. गुरुजींवर ‘सीसीटीव्ही’ची नजर! सभेतील गोंधळामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत असल्याने शिक्षक बॅँकेने सभास्थळी ‘सीसीटीव्ही’ची नजर गुरुजींवर ठेवली आहे. जिल्हा परिषदेची यंत्रणाही सभास्थळी कार्यरत राहणार असून, आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी केली आहे. काही थोड्या शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षक बदनाम होत आहेत. सभासदांनी जे काही प्रश्न असतील ते लोकशाही मार्गाने विचारावेत. समर्पक उत्तर देण्याची बांधीलकी आमची राहील. - राजमोहन पाटील, अध्यक्ष, शिक्षक बॅँक
परंपरा खंडित करणार?
By admin | Published: July 31, 2016 12:41 AM