कोल्हापूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह महापालिकेच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी शुक्रवारी दिली. महापौर लाटकर, उपमहापौर संजय मोहिते यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी महापौर लाटकर व उपमहापौर मोहिते यांचे स्वागत केले. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
त्यानंतर बोलताना शहरातील विविध प्रश्नांचा महापौर लाटकर यांनी उल्लेख केला. शहरातील वाहनांची संख्या तसेच कमी पडणारे रस्ते यांचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, वाहनधारकांची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्या-त्या केल्या जातील. वाहतुकीला शिस्त लागली की आपोआप वाहतूक सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असेही महापौर म्हणाल्या.
थेट पाईपलाईन योजना, अंबाबाई मंदिर विकास आराखडा यांसह प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांची दुरुस्तीही सोमवार (दि. २५) पासून अधिक व्यापक पातळीवर हाती घेण्यात येत आहे, असे महापौरांनी सांगितले. यावेळी सभागृह नेता दिलीप पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर उपस्थित होते.कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी दिलीप पोवार, कुमुदिनी कदम, अनुप प्रियोळकर, राजेश लाटकर उपस्थित होते.