राजाराम कांबळे ल्ल मलकापूरवारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास राज्य शासन गती देणार का, असा प्रश्न शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आशिया खंडातील पहिले मातीचे धरण चांदोली येथे शासनाने बांधले आहे. चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील कोतोली, भेडसगाव, सरूड, चरण, डोणोली, सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. १९७७ ते ७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारणपणे ७० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रखडत हे काम चालू होते. आजपर्यंत काम बंद अवस्थेत आहे. कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नाममात्र दराने मोबदला मिळाला. काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन न करता कालव्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अर्धवट असे सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या कालव्यासाठी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सुमारे चारशे ते पाचशे एकर जमीन कालव्याच्या खुदाईत गेली आहे. शेतकऱ्यांना हा कालवा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष देऊन निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यांतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.१ २००६ साली या कालव्याचे काम सुरू झाले त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वास जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. २ हा कालवा कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे. दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे. या कालव्याचे झालेले कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. चांदोली धरणातून काम पूर्ण झालेल्या कालव्यात पाणी सोडले की संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरते. कालव्याला सर्व ठिकाणी गळती लागली आहे.
वारणा उजवा कालव्याच्या कामास गती मिळणार का?
By admin | Published: April 23, 2017 11:58 PM