राहूल मांगुरकर
अर्जुनवाड : येथील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटबाजीच्या व परंपरागत पद्धतीला छेद देत येथील पुरोगामी मंडळींनी या निवडणुकीत सर्वच्या सर्व तेरा जागी गावातील महिलांना निवडणुकीत उभे करण्याचा चंग बांधला आहे. अर्जुनवाड ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेली कित्येक वर्षे गावातील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. याचा फायदा घेत अनेक योजना शेजारील गावांनी उचलल्या. विविध समस्यांबरोबरच गेल्या चाळीस वर्षांत ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वगळता कधीच उत्पन्न वाढीचा विचार केला नाही. यापूर्वी उमराव कोकणे यांच्या काळात नारळाची झाडे लावून शाळेच्या खोल्या बांधून उत्पन्न वाढविले, तर सध्या गावात असलेल्या मोठ्या औद्योगिक उद्योगाची नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. तर अशा उद्योगांना साध्या पद्धतीने कर आकारणी करून राजकीय दबावाखाली उत्पन्न बुडविले जात आहे. एकाच ठेकेदाराला कामे देणे, नैसर्गिक समतोल पाहता झाडे लावण्याचा बनाव करत ती जगविण्याऐवजी योजनेतुन अनेकांनी आर्थिक विकास साधला.
ग्रामपंचायतीमध्ये तेरा सदस्य निवडून आले असले तरी प्रामुख्याने दोन ते तीन सदस्यच कारभार पाहतात, तर बाकीचे सदस्य नाममात्र राहतात. त्यामुळे गावचा विकास साधण्याऐवजी स्वत:चा विकास साधला गेला. याची पुनरावृती टाळण्यासाठी तसेच गावातील बहुतांश मोठ्या घरातील अनेक सदस्य ग्रामपंचायत सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, इतर संस्थांमध्ये यापूर्वी निवडून येऊन एकाच घरात सरपंच, अध्यक्ष, सदस्य अशी घराणेशाही चालत आलेली आहे; पण त्याच समाजातील दुर्बल घटकांना या पदापासुन वंचित ठेवण्यात आले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत ज्या कुटुंबात कोणतेही पद दिले गेले नाही, अशा वंचित घरातील होतकरू महिलांना संधी देऊन सर्वच्या सर्व तेरा जागी महिलांना उभे करण्याचा आणि पारंपरिक पद्धतीला छेद देण्यासाठी पुरोगामी मंडळी व्यूहरचना करत आहेत.